गडचिरोली : संत निरंकारी मंडळ चामोर्शी व भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत “स्वच्छ जल, स्वच्छ मन” या उपक्रमाद्वारे मार्कंडादेव शिवमंदिराच्या परिसरातील वैनगंगा नदीपात्रालगत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रोत्सवाचे औचित्य साधून मार्कंडा देवस्थान येथील उत्तरवाहिनी वैनगंगा नदीपात्राची रविवारी स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. यात जवळपास 700 भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या सुरूवातीला सदगुरू प्रार्थना करण्यात आली. उद्घाटन मार्कंडादेव ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता मोगरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी चामोर्शी संत निरंकारी मंडळाचे अध्यक्ष अशोक बोरकुटे होते. यावेळी मंडळाचे संचालक भोजराम लंजे, देवनाथ धोडरे, फुलचंद गेडाम, निरंजना रामटेके, प्रफुल्ल गव्हारे, वंदना धोडरे, विद्या बोरकुटे, संभाजी भुरसे, नामदेव गव्हारे, कोमरू मिटपल्लीवार, सुरेश बावणे, सुधाकर लोणारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्वांसाठी लंगर, चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.
संत निरंकारी मिशन हे अध्यात्मिक मिशन असून मानवसेवेचे कार्य अविरतपणे करीत आहे. भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रोजेक्ट अमृत अंतर्गत भारतातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करण्याचे कार्य मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. यावर्षी भारतातील जवळपास 3 हजार 500 ठिकाणी स्वच्छ जल, स्वच्छ मन उपक्रमांतर्गत जलसाठा स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
स्वच्छता अभियानाच्या यशस्वितेसाठी रामदास पुंगाटी, घनश्याम बोदलकर, नाजूक येलमुले, रवींद्र बुरांडे, कल्पना सातपुते, रूपचंद कुमरे, महेंद्र बोरकुटे, आशुतोष कोठारे, पियुष बोदलकर, बालाजी गव्हारे, संतोष आलेवार, संतोष वडेंगवार, सुभाष मिटपलीवार, प्रमोद देवगिरकर, प्रमोद सातपुते, घनश्याम वासेकर, प्रभाकर कडस्कर, मंगला गेडाम, सिडाम माताजी, उज्वला बुरांडे, वैशाली लंजे, धनराज मडावी, सिंधुताई पुंगाटी, अशोक पुलीवार, अवतार तंटकवार आदींनी मोलाचे सहकार्य केले.