आता वडसा रेल्वे स्टेशनवर थांबणार वैनगंगा एक्सप्रेस, लवकरच शुभारंभ

खा.अशोक नेते यांच्या प्रयत्नांना यश

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा (देसाईगंज) स्थानकावर कोरोनाकाळापासून अनेक सुपरफास्ट आणि पॅसेंजर गाड्या बंद होत्या. कोरोनाकाळ संपल्यानंतरही या गाड्या सुरू झाल्या नसल्यामुळे नागरिकांची अडचण वाढली होती. खा.अशोक नेते यांनी यासंदर्भात वेळोवेळी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे महत्वाच्या अशा यशवंतपूर- कोरबा या वैनगंगा एक्सप्रेसला वडसा स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

कोरोनाकाळापूर्वी कोरबा-यशवंतपूर या वैनगंगा सुपरफास्ट एक्सप्रेसचा थांबा वडसा स्थानकावर होता. परंतु कोरोनाकाळात बंद केलेल्या थांब्यानंतर आतापर्यंत या गाडीचा थांबा वडसा येथे मिळाला नव्हता.

देसाईगंज (वडसा) या ठिकाणी एक्सप्रेस गाड्यांचा थांबा द्यावा यासाठी अनेक दिवसांपासून व्यापारी, कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थ्यांसह रेल्वे प्रवाशांची मागणी होती. खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे वारंवार भेट घेऊन यासंदर्भात पाठपुरावा केला. त्याला बऱ्याच प्रमाणात यश आले. यापूर्वी सालेकसा, आमगाव, वडसा स्थानकांवर अनेक गाड्यांना त्यांनी थांबा मिळवून दिला. आता वैनगंगा एक्सप्रेसही थांबा मिळवून देण्यात यश आले.

लवकरच हिरवी झेंडी दाखवून या गाडीच्या थांब्याचा शुभारंभ केला जाईल, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली.