अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकास कामांसाठी निधी मंजूर करा

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे ना.मुनगंटीवार यांना निवेदन

अहेरी : अविकसित असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात विकासात्मक कामांना भरपूर वाव आहे. त्यामुळे या कामांसाठी पुरेसा निधी मंजूर करून या कामांना चालना द्यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृउबा समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. शनिवारी भाजपच्या मेळाव्यासाठी ना.मुनगंटीवार अहेरीत आले होते. यावेळी कंकडालवार यांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी खासदार अशोक नेते उपस्थित होते.

निवेदनात नमूद केल्यानुसार, अहेरी येथील प्राणहिता नदीवर लिफ्ट एरीगेशन करून शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा करावी, आलापल्ली अहेरी हा सुरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे खराब झालेला रस्ता दुरूस्त करावा व लोहखनिज वाहतूक बंद करावी, वर्ष २०२१-२२ मध्ये आलापल्ली ते अहेरीपर्यंतच्या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे लोहखनिज वाहतुकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अहेरी येथील मुख्य रस्त्याचे रूंदीकरण करावे, अहेरी विधानसभा क्षेत्रातील नगर पंचायतींमध्ये रिक्त असलेले मुख्याधिकारी पद भरण्यात यावे, प्रत्येक तालुक्यात सांस्कृतिक भवन मंजुर करावे, अहेरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामिण भागात रस्त्याची कामे प्रलंबित आहेत ती कामे मंजुर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, कागजनगर ते अहेरीपर्यंत रेल्वे लाईन सुरू करावी, भूमी उपअभिलेख विभाग अहेरी येथे जमिनीचे खोटे दस्तावेज तयार करून खोटे प्रॉपर्टी कार्ड, मृत्यूनंतर जीवंत असल्याचे दाखवून पोटहिस्सा व फेरफार करण्यात आले, याची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अहेरी नगर पंचायतअंतर्गत खाजगी ले-आउटमध्ये शासकीय निधीचा वापर करून विकसित करण्यात आले, याची चौकशी करून खाजगी ले-आउट धारकांकडून ती रक्कम वसूल करण्यात यावी, अहेरी विधानसभा क्षेत्रात ज्या गावात वीज नाही तिथे विद्युत पुरवठा पोहचविण्यात यावा, अहेरी येथे ३३ के.वी. स्टेशन तयार करण्यात यावे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी, आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, अहेरीच्या नगराध्यक्ष रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, नगरसेविका ज्योती सडमके, महिला व बालकल्याण सभापती मिना ओंड्डरे, नगरसेविका सुरेखा गोडशेलवार, माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके, सुरेखा आलाम, बांधकाम सभापती नौरास शेख, नगरसेवक विलास गलबले, महेश बाकेवार, प्रशांत गोडशेलवार, विलास सिडाम, सुरेखा गोडशेलवार, माजी सरपंच गुलाबराव सोयाम, मीना गर्गम, आविसंचे ग्रामीण तालुका अध्यक्ष नरेंद्र गर्गम आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.