Home पब्लिक प्रॉब्लेम आश्रमशाळांवर शिक्षकांची लागली सुटीच्या दिवशी व रात्रपाळीत ड्युटी

आश्रमशाळांवर शिक्षकांची लागली सुटीच्या दिवशी व रात्रपाळीत ड्युटी

शिक्षक दिनी काळ्या फिती लावून निषेध

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी रात्रपाळीत ड्युटी लावली जात आहे. प्रकल्प प्रशासनाच्या वतीने होत असलेल्या या बळजबरी व अन्यायकारक धोरणाच्या विरोधात आदिवासी विकास विभागाच्या शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षक दिनी (5 सप्टेंबर) काळ्या फिती लावून या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदविला.

राज्यातील गडचिरोली, कळवण, नाशिक, शहापूर अशा काही प्रकल्पातील शिक्षकांवर ही सक्ती केली जात आहे. त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात सीटू संलग्नित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शिक्षक दिनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. संघटनेच्या या आवाहनाला शिक्षकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.

शिक्षक पहारेकऱ्याच्या भूमिकेत?

आश्रमशाळा संहितेनुसार अधीक्षक व अधिक्षिकांनी त्यांच्याकडील प्रभाराची जबाबदारी एकमेकांकडे द्यायची असताना तो प्रभार शिक्षकांकडे दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या नावाखाली शिक्षकांच्या रात्रपाळ्या लावून जणू पहारेकर्‍याची जबाबदारी दिल्या जात आहे. यामुळे सेवाशर्ती व कामाच्या तासाचे उल्लंघन होत आहे. महिला हक्क, विशाखा समिती मार्गदर्शक तत्वे व सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत आहे. घटनात्मक व मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली.

अन्यायकारक सक्ती व दडपशाही

कौटुंबिक जीवन, आरोग्य व पुरेशी विश्रांती यावर आघात होत आहे. तसेच शिक्षक व शिक्षिकांवर रात्री व्हिडिओ देखरेख करून गोपनीयता व सन्मानाचे उल्लंघन होत आहे.आश्रमशाळेत काही अप्रिय घटना घडल्यास दोषारोप सिद्ध होण्यापूर्वीच शिक्षक, मुख्याध्यापक, अधीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्या जात आहे. महिला शिक्षकांना रात्री नियमबाह्य कामाची सक्ती केली जात आहे, असा संघटनेचा आरोप आहे. या व इतर अन्यायकारक सक्ती आणि दडपशाहीच्या निषेधार्थ आश्रमशाळेतील शिक्षक आता एकवटले आहेत.

राज्यभरात आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे व्हाट्सअप ग्रुप तसेच सोशल मीडिया मध्ये प्रकल्प प्रशासनाच्या विरुद्ध संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने आश्रम शाळा शिक्षकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. शिक्षकांची प्रतिमा मलीन करून आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कसा होईल? असा प्रश्न संघटनेने केला आहे.

शिक्षक दिनी सत्कार नाही, सक्ती

आदिवासी विकास विभागाच्या वतीने आश्रम शाळेतील शिक्षकांचा सत्कार तर दूरच उलट शिक्षक दिनीच काळ्याफिती लावून निषेध करण्याची पाळी शिक्षकांवर यावी ही दुर्दैवी बाब असून याची वेळीच दखल आदिवासी विकास विभाग प्रशासनाने घ्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.आदिवासी विकास विभाग प्रशासनाच्या वतीने आश्रम शाळा शिक्षकांना नियमबाह्य, दडपशाही व अन्यायकारक अशैक्षणिक कामाचा अतिरिक्त भार देणे यापुढे थांबविले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा.बी.टी. भामरे यांनी दिला आहे.