गडचिरोली : वाघांच्या हल्ल्यात बळी पडून होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी अतिरिक्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील वाघांना दुसऱ्या क्षेत्रात हलविण्याचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात अभ्यास करून विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सद्यपरिस्थितीचा अभ्यास करून विशेष उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. त्यात गेल्या पाच वर्षात वाघ्र हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना विशेष नुकसानभरपाई देण्यासह अतिरिक्त झालेल्या वाघांचे स्थलांतर अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भातील अहवाल तीन महिन्यात देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. त्यासाठी माजी सनदी अधिकारी आणि राज्य शासनाच्या अधिपत्याखालील ‘मित्रा’ संस्थेचे सदस्य सचिव प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार परदेशी यांनी नागपुरात वरिष्ठ वनअधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चाही केली.
पाच वर्षात 50 पेक्षा जास्त बळी
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात सुमारे 50 पेक्षा अधिक मनुष्यांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः गडचिरोली, चार्मोशी, आरमोरी, वडसा आणि धानोरा क्षेत्रात वाघांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीतील परिस्थितीचा अभ्यास करून अतिरिक्त वाघांचे स्थलांतर तीन महिन्यात करावे, तसेच गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची माहिती गोळा करून त्यांच्या वारसदार कुटुंबियांना विशेष नुकसानभरपाई देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.
अभयारण्यातील झाडे कापणार?
परिस्थितीचे अवलोकन करून आराखडा तयार करण्यासंदर्भात ‘मित्रा’चे सदस्य सचिव परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा व प्राणहिता अभयारण्यात सागवान झाडांचे विरळीकरण करणे, म्हणजे घटदाट जंगलातील झाडांची कटाई करून ते विरळ करणे आणि कुरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय त्या बैठकीत झाला. तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढून मांसभक्षी प्राण्यांना खाद्य मिळेल, हा त्यामागे उद्देश असल्याचे सांगण्यात आले. परंतू हा उपाय काहीसा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
पोलीस पाटलाच्या धर्तीवर वनपाटलाची नेमणूक
प्रत्येक गावात पोलीस पाटलाच्या धर्तीवर वनपाटील नेमण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. स्थानिकांना जंगलात लाकूड, सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागू नये यासाठी गावामध्ये पाईपलाइनद्वारे CBG गॅस पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या शेतात गवत उत्पादन करणे, आणि त्याचा उपयोग सीबीजीसाठी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी सीबीजी गॅस प्लान्ट उभारण्याचेही ठरविण्यात आले. वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई लवकर देण्यासाठी ई पंचनामा करणे, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन चपराळा अभयारण्यातील ६ गावांच्या स्थलांतरासाठी तेथील स्थानिकांचे सामाजिक, आर्थिक मूल्यांकन करणे, पुनर्वसनासाठी नव्या जागेचा शोध घेणे आदी उपाययोजना राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यासंबंधीच्या उपाययोजना करताना या विषयावर काम करणाऱ्या वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांच्या तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. धोकाग्रस्त व संवेदनशील क्षेत्राचे सौम्यीकरण (मिटीगेशन) आराखडा तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. मानव आणि वन्यजीव संघर्षात आढळणारे वाघ हे वयस्कर असल्याचे दिसून येते. अशा वाघांच्या स्थलांतर संदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.
या बैठकीला राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर, गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वन संरक्षक एस.रमेशकुमार आदी उपस्थित होते.