रेती तस्करीसाठी लाच घेणाऱ्या वनपालाच्या संपत्तीची होणार चौकशी

गडचिरोली : जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या रेती तस्करीला उधान आले आहे. वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेतीच्या वाहनांना संबंधित बीटमधील वन कर्मचाऱ्यांकडून अभय दिले जात आहे. त्यातूच दोन दिवसांपूर्वी पुराडा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत कोहका उपक्षेत्राचे वनपाल नरेंद्र तोकलवार यांना 20 हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने पकडले होते. आता त्यांच्या संपत्तीचीही चौकशी केली जाणार आहे. यासोबतच लाचखोरी करत गब्बर झाल्याचा संशय असणारे अनेक जण एसीबीच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

वनपाल नरेंद्र तोकलवार याने रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी 25 हजारांचे लाच संबंधिताला मागितली होती. तडजोडीअंती त्याने 20 हजार रुपये स्वीकारले. पण एसीबीच्या पथकाकडे याची आधीच तक्रार झाल्याने त्यांनी कारवाई करत तोकलवार याला ताब्यात घेतले.

जिल्ह्याच्या अनेक भागातून वाहणाऱ्या नद्यांमधील रेती रात्रीच्या वेळी काढून वाहतूक केली जाते. ज्यांच्या क्षेत्रातून ही रेती वाहतूक केली जाते त्या वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह महसूल विभागातील काही कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीही यात गुंतले आहेत. लाचखोरीतून हा सर्व प्रकार बिनबोभाटपणे सुरू असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागही अॅक्शन मोडवर आला आहे.