निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत काँग्रेसची निदर्शने

मतदार दिनानिमित्त केले आंदोलन

गडचिरोली : राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून दि.25 जानेवारी रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंदिरा गांधी चौकात निदर्शने करून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

2019 ते 2024 च्या निवडणुकीपर्यंतच्या पाच वर्षात राज्यात 5 लाख मतदार वाढले होते. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंतच्या सहा महिन्यात राज्यात 50 लाख मतदार कसे वाढले? असा सवाल यावेळी खा.डॅा.नामदेव किरसान यांनी उपस्थित केला.

निवडणुका निष्पक्षपाती आणि पारदर्शनकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. पण मोदी सरकारने सर्वच संवैधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मते एकाएकी कशी वाढली याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही. पण आम्ही वाढीव मतदारांच्या वैधतेचे पुरावे घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.

पत्रकार परिषदेला आ.रामदास मसराम, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश राठोड, काशिनाथ भडके, प्रमोद भगत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.