
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या परिसरात खुलेआमपणे सट्टापट्टीचा अवैध व्यवसाय करण्यासाठी बसलेल्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. संध्याकाळी त्याच्यावर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून सट्टापट्टीसाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जनरेटर ठेवलेल्या जागेच्या मागील बाजुच्या एका कोपऱ्यात एक व्यक्ती दुपारी सट्टापट्टीचे आकडे घेत होता. ही बाब काही जागरूक नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) कळविली. त्यानंतर पथकाने दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक कार्यालयापासून जेमतेम 200 मीटरवर असलेल्या या शासकीय इमारतीच्या परिसरात अवैध सट्टा व्यवसाय सुरू करण्याची हिंमत केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्या ठिकाणी आकडे लावण्यासाठी काही कर्मचारीही येत असल्याचे कळते. पण पोलिसांनी चाहुल लागताच त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
विशेष म्हणजे सट्टापट्टीचे आकडे घेणारी व्यक्त केवळ रोजंदारीवर काम करणारी असून हा व्यवसाय करणाऱ्या मूळ मालकावर कारवाई होणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
































