
अहेरी : शिक्षण हेच प्रगतीचे खरे साधन आहे, या विचाराने प्रेरित होत उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांची जयंती, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरीतील राजवाडा निवासस्थानी आ.डॅा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यात डीबीए पब्लिक स्कूलच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय बॅग, नोटबुक व कंपास पेटी देण्यात आल्या.
वितरित केलेल्या शालेय बॅगवर तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे असून, “ज्ञानाची शिदोरी – उज्ज्वल भविष्याची तयारी” हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला आहे. शिक्षणाच्या प्रवासात कोणताही विद्यार्थी केवळ शैक्षणिक साहित्याअभावी मागे राहू नये, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः शैक्षणिक साहित्याचे वाटप करत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करत राहील, अशी ग्वाहीसुद्धा दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. उपस्थित शिक्षक-शिक्षिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सिनेट सदस्य तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसेच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, शाळेतील शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
































