आष्टी : येथे भाड्याच्या खोलीत एकटेच राहात असलेल्या दिव्यांग रशिद अहमद शेख (60 वर्ष) या वृद्धाच्या हत्येमागील रहस्य अखेर आष्टी पोलिसांनी उलगडले. भाड्याचे चार हजार रुपये दिले नाही म्हणून झालेल्या वादात घरमालकानेच त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे घरमालक खुशाल कुकुडकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना दि.15 डिसेंबर रोजी घडली होती. मुळचे बुटीबोरी (जि.नागपूर) येथील रहिवासी असलेले रशिद शेख हे 20 वर्षांपासून आष्टीत भाड्याच्या खोलीत राहात होते. अलिकडे त्यांनी खोली बदलविली होती आणि ते आरोपी कुकुडकर याच्याकडे तीन महिन्यांपासून राहायला आले होते. 10 डिसेंबरला रशिद शेख यांनी थकित भाड्यापोटी 2 हजार रुपये दिले होते. पण उर्वरित 4 हजार रुपयेसुद्धा लगेच देण्यासाठी कुकुडकर याने तगादा लावला होता. मात्र एवढे पैसे थकित नाही असे शेख यांचे म्हणणे होते. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी रागाच्या भरात खुशाल कुकुडकर याने रशिद शेख यांच्या डोक्यात लोखंडी रॅाड मारला. त्यानंतर सत्तुरने त्यांचा गळा चिरून पोटातही वार केले. शेख शांत झाल्याचे पाहून खोलीला बाहेरून कुलूप लावले.
या घटनेनंतर कुकुडकर यांनी पोलिसांना या घटनेबद्दल अनभिज्ञता दाखविण्याचा प्रयत्न केला. पण तांत्रिक गोष्टींची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी कुकुडकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.