चामोर्शी : शहरात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या तीन इसमांना नागरीकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांचे दोन सहकारी मात्र एका वाहनातून पळून गेले. पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीत त्या तीन इसमांकडे एक देशी कट्टा, जिवंत काडतूस, चाकू, मिरची पावडरची पुडी असे साहित्य आढळले. दुकान बंद करून घरी जाणाऱ्या ज्वेलरी दुकानदाराची पैशाची बॅग लुटण्याचा त्यांचा डाव असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले.
सविस्तर वृत्त असे आहे की, दि. 30 च्या रात्री 10.10 वाजताच्या सुमारास चामोर्शी शहरातील हत्तीगेटच्या बाजूला असलेल्या डिज्नीलँड इंग्लिश मिडीयम स्कूलजवळ काही संशयित इसम फिरताना दिसून आले. त्यांच्याबद्दल संशय आल्याने नागरीकांनी त्यांना पकडून ठेवले, तर काही सहकारी कारने पळून गेल्याची माहिती चामोर्शी ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वास पुल्लरवार यांना फोनद्वारे मिळाली. त्यावरुन पो.निरीक्षक पुल्लरवार यांच्यासह कनिष्ठ अधिकारी व अंमलदार हे खासगी वाहनाने घटनास्थळी पोहोचताच त्यांना तिथे गर्दी दिसून आली. त्यांनी पकडून ठेवलेल्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सरताज खान इजहार खान (35 वर्ष) रा.रामाळा तलाव चंद्रपूर, अमन अक्रम खान, (22 वर्ष), रा.रामटेकेवाडी, चंद्रपूर आणि गुलाम अहमद रजब अली (32 वर्ष), रा.राजूर ईजारा, वणी, जि.यवतमाळ अशी असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता, एक देशी कट्टा, त्यासोबत एक जिवंत काडतूस, धारदार चाकू, मिरची पावडरची पुडी असे साहित्य आढळून आले.
ज्वेलरी दुकानदाराला लुटण्याचा होता डाव
सदर संशयित इसमांची सखोल चौकशी केली असता, गावातील ज्वेलरी दुकानदार दुकान बंद करुन आपल्यासोबत पैशाची बॅग घेऊन घरी जात असताना त्यांना लुटायचे असा त्यांचा डाव होता. त्यासाठी त्यातील तीन इसम हे ज्वेलरी दुकानदारावर नजर ठेवून फिरत होते, तर अन्य दोघे कारमध्ये बसून होते. तिघेही संशयित इसम गावात फिरत असताना गावातील लोकांना त्यांच्यावर संशय आल्याने लोकांनी त्यांना पकडून ठेवले होते. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन तीन आरोपींना अटक करण्यात आली. अन्य दोन आरोपींचा शोध सुरु आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी येथील प्रभारी अधिकारी विश्वास पुल्लरवार, उपनिरीक्षक बालाजी लोसरवार, दुर्योधन राठोड, राधा शिंदे, हवालदार राजेश गणवीर, व्यंकटेश येल्लला यांनी पार पडली. या घटनेप्रमाणे नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.