गडचिरोली : औषधी विक्रीचा परवाना निलंबित केलेला असतानाही बिनबोभाटपणे औषधीची विक्री करत असलेल्या गोकुळनगरातील सहयोग मेडिकलवर औषधी निरीक्षकांनी छापा टाकला. त्यात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व कलम 18 (8) अंतर्गत कारवाई करून जवळपास 5 लाखांचा औषधीसाठा जप्त करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, कोणत्याही मेडिकल स्टोअर्समध्ये औषधांची विक्री ही रजिस्टर्ड फार्मसिस्टच्या उपस्थितीत आणि डॅाक्टरांच्या चिठ्ठीवरच करावी हा नियम आहे. याशिवाय औषधी विक्री व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 चे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र गोकुळनगरातील सहयोग मेडिकलमध्ये या नियमांचे पालन होत नसल्याचे औषधी निरीक्षकांच्या निदर्शनास आल्याने सहयोग मेडिकलचा औषधी विक्री परवाना निलंबित करण्यात आला होता. अशा स्थितीत औषधीची खरेदी-विक्री करता येत नाही. मात्र परवाना निलंबनाच्या कालावधीतही बिनधास्तपणे औषधीची विक्री होत असल्याचे औषधी निरीक्षक नालंदा उरकुडे यांच्या निदर्शनास आले.
उरकुडे यांनी प्रत्यक्षात मेडीकलची तपासणी केली असताना 4.95 लाखांचा औषधीसाठा मेडीकलमध्ये विक्रीसाठी ठेवलेला असल्याचे दिसून आले. त्यांनी दुकानमालक वैशाली भुरसे यांना जाब विचारला असता त्या समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाही. त्यामुळे तो औषधीसाठा जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई प्र.सहायक आयुक्त निरज लोहकरे, सहआयुक्त विराज पौनिकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.