वर्षभरात जिल्ह्यात 55 एचआयव्हीबाधित रुग्णांची भर, 39270 जणांची तपासणी

जनजागृतीमुळे संसर्गात झाली घट

गडचिरोली : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एचआयव्ही समुपदेशन व चाचणी केली जाते. सततची जनजागृती आणि तपासण्यांमुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. गेल्या 10 वर्षाच्या तुलनेत एड्स संसर्गाचे प्रमाण घटल्याचे सकारात्मक चित्र आहे. गेल्या वर्षभरात जिल्हाभरात 55 एचआयव्ही पॅाझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. लवकरच हे प्रमाण शुन्य टक्क्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रणासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत जिल्हा स्तरावरून जिल्हा रुग्णालयामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रणासाठी वेगवेगळ्या सेवा कार्यरत आहेत. त्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागही कार्यरत आहे.

सध्या जिल्हयात एचआयव्ही समुदेशन व चाचणी करण्यासाठी एकूण 7 आयसीटीसी केंद्र कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे 3 पीपीपी, 54 एफआयसीटीसी, 1 जेल, 1 एआरटी केंद्र व 1 गुप्तरोग केंद्र कार्यरत आहे. ज्या ठिकाणी प्रशिक्षित समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये एचआयव्ही समुपदेशन, विशेषत: व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रबोधन केले जाते. त्याचप्रमाणे जे संर्सगित आढळले आहेत, त्यांना औषधोपचार तसेच मानसिक आधार सामाजिक योजनांचा लाभ दिला जात आहे.

सन 2024-25 मध्ये 25 हजार 656 एचआयव्ही समुदेशन व चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी संसर्गीत आढळलेले रुग्ण 53 (0.21 टक्के) आहेत. याशिवाय गरोदर मातांच्या 13 हजार 614 एचआयव्ही समुदेशन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी संसर्गीत आढळलेले रूग्ण केवळ 2 (0.01%) आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.माधुरी किलनाके यांनी कळविले.