अहेरीत तेलगू गाण्यांवर थिरकताहेत गरबा नृत्य करणाऱ्या महिलांचे पाय

दाक्षिणात्य संस्कृतीच्या बतकम्मासह दुर्गोत्सवाची धूम

अहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये तेलगू भाषेचा आणि तिकडच्या संस्कृतीचा प्रभाव आहे. दुर्गा उत्सवातही त्याचा प्रत्यय येत आहे. अहेरी येथे दुर्गा उत्सवासोबत बतकम्मा उत्सवही उत्साहात सुरू असून गरब्याप्रमाणे फुलांनी सजविलेल्या बतकम्मा देवीभोवती फेर धरून नृत्य केले जात आहे. तेलगू गाण्यांवर महिला आणि मुली ताल धरत आहेत. या भागात मराठीसोबत तेलगूही बोलल्या जात असल्यामुळे त्या तेलगू गाण्यांचा अर्थही त्यांना कळतो.

विशेष म्हणजे इतर भागात गरबा नृत्यासाठी घागरा-चोली हा पेहराव केला जातो, पण या भागात दाक्षिणात्य पद्धतीच्या साड्या किंवा सलवार सुट असा पेहराव करण्यास महिलावर्ग प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी या दुर्गा उत्सवाचा समारोप होणार आहे.