गडचिरोली : अनुसूचित जमातीतील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून शासकीय सेवेत संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने एमपीएससी, जिल्हा निवड समितीमार्फत होणाऱ्या विविध पदभरती तसेच IBPS व SSC परीक्षांसाठी मोफत स्पर्धापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे उमेदवार पात्र असून, इच्छुक उमेदवारांकडे शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच वैध रोजगार नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने राहणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक पात्र प्रशिक्षणार्थीला दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच आणि प्रशिक्षण पूर्णत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठीचे अर्ज संबंधित कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून, इच्छुकांनी 28 जुलै 2026 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. पात्र उमेदवारांची मुलाखत 29 जुलै 2026 रोजी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल, बॅरेक क्रमांक 2, गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 8485814488 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.
































