लाखो रुपयांच्या दारू बाटल्यांवर आरमोरीत फिरवला रोड रोलर

४० दुचाकी, ६ चारचाकींचा लिलाव

आरमोरी : दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारुची वाहतूक करताना पकडलेल्या लाखो रुपयांच्या दारूच्या बाटल्यांवर रोड रोलर फिरवून त्या नष्ट करण्यात आल्या. विविध कारवायांमधील जप्त दारू आणि वाहने मिळून 75 लाख 93 हजार रुपयांच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यात आली. गुन्ह्यात जप्त केलेल्या 40 दुचाकी आणि 6 चारचाकी वाहने भंगारात विकण्यात आली. आरमोरी पोलिस स्टेशनकडून ही कार्यवाही करण्यात आली.

महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार आरमोरी पोलिसांनी सन 2018 ते ऑगस्ट 2023 पर्यत प्रलंबित असलेल्या 247 गुन्ह्यातील देशी/विदेशी दारुच्या एकुण मुद्येमालाची प्रथम श्रेणी न्यायालय आरमोरी यांच्या आदेशाने व अधीक्षक, राज्य उत्पादक शुल्क यांचेमार्फत, संबंधित अधिकाऱ्यांच्या समक्ष नगर परिषद आरमोरी यांनी नेमुन दिलेल्या जागेवर विल्हेवाट लावण्यात आली.

मोठा खड्डा खोदून दारूच्या बाटल्यांवर रोड रोलर चालवून त्याचा चुराडा करण्यात आला. नंतर या काचा खड्ड्यात पुरण्यात आल्या. याशिवाय गुन्हयासंबंधी जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे लिलाव करण्यासाठी मोटार वाहन निरिक्षक मोडक यांचेकडून वाहनाची किंमत निश्चित करुन ना.तहसीलदार एच.एन. दोनाटकर यांचे अध्यक्षतेखाली स्थापित समितीने लिलाव प्रक्रिया केली. त्यात 40 नग दुचाकी वाहने 1,58,000 रुपयांना, तर चारचाकी 6 वाहने 2,33,100 रुपयांना विकल्या गेली. लिलावातून प्राप्त झालेली रक्कम 3,91,100 रुपये शासन खात्यात जमा करण्यात आली.

ही कारवाई प्रभारी पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक अहेरी एम.रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली मयुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी येथील प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या नेतृत्वात व हेड मोहरर पोहवा रघुनाथ तलांडे व अंमलदार यांच्या उपस्थितीत पार पडली.