नदीपलिकडून गडचिरोली शहरात येणारी अडीच लाखांची दारू पकडली

राज बारच्या संचालकासह मॅनेजरवर गुन्हा

गडचिरोली : वैनगंगा नदीच्या पलिकडे चंद्रपूर जिल्ह्यात हद्दीतील राज बारमधून गडचिरोली शहरात दारूच्या पेट्या घेऊन येणारे वाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्या वाहनातील अडीच लाखांची विदेशी दारू, बिअरच्या पेट्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई सेमाना बायपास मार्गावर करण्यात आली.

व्याहाड येथील निरज मंडलवार हा राज बारचा मॅनेजर गुड्डू खोब्रागडे याच्या डस्टर गाडीने चालक मयूर बल्लमवार याच्या मदतीने दारूच्या पेट्या गडचिरोलीकडे पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून सेमाना बायपास मार्गावर त्या वाहनाला पकडले.

या कारवाईत मयुर बल्लमवार या चालकाला अटक करण्यात आली. त्याने चौकशीदरम्यान नीरज मंडलवार हा दारूची वाहतूक करताना नवेगाव येथे उतरल्याचे सांगितले. त्यामुळे तिघांवरही दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड आणि पाच अंमलदारांनी मिळून केली.