Home दैनंदिन बातम्या दोन दुचाकींच्या पेट्रोल टँक आणि सीटखाली तब्बल 400 निप दारू !

दोन दुचाकींच्या पेट्रोल टँक आणि सीटखाली तब्बल 400 निप दारू !

वैनगंगा नदीजवळ पोलिसांची कारवाई

दुचाकींच्या पेट्रोल टँक आणि सीटखालील जागेतून दारूच्या निप काढताना आरोपी

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विविध मार्गाने दारूची आयात करण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतील व्याहाडमधून दुचाकी वाहनाने दारूची आयात करण्यासाठी चक्क पेट्रोल टँक आणि सीटखालील रिकाम्या जागेचा वापर केल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. (खाली वाचा)

गडचिरोली पोलिसांनी वैनगंगा नदीजवळील नाक्यावर केलेल्या तपासणीत एका दुचाकीत लपवून 200 मिलीच्या तब्बल 200 देशी दारूच्या निप आणल्या जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी अशा दोन दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल केले. (खाली वाचा)

दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी अवैध दारु विक्री आणि वाहतूक करणा­ऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमांवर 24 तास तपासणी करण्यासाठी नाकेही लावण्यात आले आहेत. गडचिरोली ते चंद्रपूर रोडवरील वैनगंगा नदीजवळ गडचिरोली पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान दोन युवकांकडून दुचाकीमध्ये लपवून दारूची आयात केली जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार दोन संशयित इसम भरधाव वेगाने दोन दुचाकी वाहनांनी गडचिरोलीकडे येत असताना त्यांना थांबवून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली.

दुचाकी क्र.एम एच 34, ए ई 8865 च्या पेट्रोल टँक आणि सीटच्या आत 90 मिली मापाच्या रॉकेट संत्रा देशी दारुच्या 200 नग निप (किंमत 16,000 रुपये), तसेच पल्सर दूचाकी वाहन क्र.एम एच 34, ए एक्स 9809 च्या पेट्रोल टँक व सिटच्या आत त्याच कंपनीच्या 200 नग निप आढळल्या. दोन्ही दुचाकी मिळून एकूण 32 हजारांची देशी दारू आणि दोन्ही दुचाकी असा मिळून एकूण 2 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत आरोपी तानाजी नानाजी पेंदोरकर (32 वर्षे) आणि सौरभ प्रकाश महाजनवार (19 वर्षे), दोघेही रा.व्याहाड (बु.) ता.सावली, जि.चंद्रपूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई प्रभारी एसडीपीओ (गडचिरोली) सुयश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि.विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.