गडचिरोली : नांदेड जिल्ह्यातील बोडार गावातील युवक अक्षय भालेराव याने आपल्या गावात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरून जातीय द्वेषभावनेतून गावातील काही तरुणांनी 1 जून 2023 रोजी अक्षय भालेराव या तरुणाची हत्या केली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आणि पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आताही जातीयवादी कारणातून अशा प्रकारे हत्या होत असेल तर ही महाराष्ट्रासाठीच नाहीतर संपूर्ण देशासाठी निंदनीय बाब आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी नांदेड जिल्ह्यातील या घटनेतील आरोपींना तत्काळ पकडून फाशीची शिक्षा करावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने केली.
यापुढे असे जातीयवादी कृत्य घडू नये यासाठी प्रयत्न करावे आणि अक्षय भालेराव या तरुणाला मरणोत्तर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देताना तालुका अध्यक्ष वसंत राऊत, एनएसयुआयचे अध्यक्ष गौरव आलाम, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष जितेंद्र मुनघाटे, सुधीर बांबोडे, निकेश कमिडवार, निलेश गेडाम, ज्ञानेश्वर पोरटे, रसिका कोवे, शीला नेता, किरण कुमरे, कमला कुंबरे, मनीषा कुमरे, वनिता कुम्रे, कांता मलगम, उर्मिला गेडाम आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.