श्रीरामाचा जयजयकार करत थिरकले पिवळ्या-तांबड्या वस्रात गडचिरोलीकर

कसा होता शोभयात्रेचा उत्साह, पहा व्हिडीओ

गडचिरोली : अयोध्येतील नवनिर्मित मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्हा भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला. सोमवारी सकाळी गडचिरोली शहरात अतिशय उत्साहात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पिवळ्या-तांबड्या वस्रांमध्ये महिला-पुरूषांनी सहभागी होऊन श्रीरामाचा गजर केला. उत्साह आणि आनंदाच्या या क्षणात सर्वांचे पाय थिरकत होते.

शहरातील साई मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने फिरून सर्वोदय वार्डातील राम मंदिरात पुजन करून इंदिरा गांधी चौकात समाप्त झाली. यावेळी डीजेच्या तालावर नाचत युवा वर्गाने एकच जल्लोष केला. खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी या शोभायात्रेत सहभागी होऊन पूर्णवेळ पायी चालत होते. अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये प्रसादाचे आयोजन केले होते.

संध्याकाळी गुलमोहर कॅालनीमधील महिलांनी आरमोरी मार्गावरील शिवपार्वती मंदिरात दिव्यांची आरास करत पुजन केले. इंदिरा गांधी चौकात संध्याकाळी लक्षवेधी आतषबाजी करत युवा वर्गाने आनंद साजरा केला.