भक्तीमय वातावरणात ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने दुमदुमली आलापल्ली नगरी

'कलश यात्रे'ने वेधले सर्वांचे लक्ष

आलापल्ली : आयोध्या येथे होणाऱ्या रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापणेनिमित्त आलापल्ली येथील श्रीराम मंदिरात पाच दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात २१ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास काढण्यात आलेल्या ‘कलश यात्रे’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनीही यात सहभागी होऊन महिलांचा उत्साह वाढविला. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ‘जय श्रीराम’च्या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

आलापल्ली येथे श्रीराम मंदिर कमिटी, श्रीराम जन्मोत्सव कमिटी यांच्या वतीने १७ ते २२ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात श्रीराम नामजप यज्ञ, हनुमान चालिसा पठण, रामरक्षा पठण, आरती, गरबा नृत्य, कलश यात्रा आदी कार्यक्रम घेऊन २२ जानेवारी रोजी श्रीराम अभिषेक पूजा करण्यात आली. तसेच रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण म्हणजे बहुप्रतीक्षित राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचे या ठिकाणी थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

२१ तारखेला सायंकाळच्या सुमारास महिलांनी विविध मंदिरातून श्रीराम मंदिरापर्यंत आणि मुख्य चौकात काढलेल्या कलश यात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आलापल्ली आणि नागेपल्लीतील प्रत्येक प्रभागातून महिला एकत्र आल्या होत्या. कलश यात्रेत भाग्यश्री आत्राम सहभागी झाल्याने महिलांचा उत्साह आणखीच वाढल्याचे दिसून आले.