एटापल्ली तालुक्यातही क्रिकेटचा ज्वर, जीवनगट्टात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

एटापल्ली : तालुक्यातील तरुणांमध्ये प्रचंड क्रीडा कौशल्य आहे. त्यामुळे प्रत्येक खेळामध्ये ते नाविन्यपूर्ण कामगिरी करताना दिसून येतात. क्रिकेट,कबड्डी, खो-खो, व्हॅालीबॉलसारख्या खेळात मैदान गाजविण्याची ताकत त्यांच्यात आहे. त्यामुळे या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन तालुक्याचा नावलौकिक करा, असे आवाहन माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम जीवनगट्टा येथे आयबी रिटर्न्स क्रिकेट क्लबतर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पं.स. सदस्य बेबी नरोटे, नगर पंचायतचे गटनेते जितेंद्र टिकले, राकाँचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, पोलीस पाटील संभाजी हिचामी, जेष्ठ नागरिक रेनुजी हिचामी, नगर पंचायतीचे पाणीपुरवठा सभापती किसन हिचामी, नगरसेवक निजाम पेंदाम, भूमिया फकरीजी हिचामी, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, कैलास कोरेत, संदीप वैरागडे, अजय पदा, संतोष पदा, दसरू मट्टामी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिवनगट्टासारख्या गावात पहिल्यांदाच क्रिकेट स्पर्धेसाठी ५१ हजार, ३१ हजार आणि २१ हजार असे बक्षिस ठेवण्यात आल्याने विविध भागातील क्रिकेट चमुंनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. उद्घाटनासाठी भाग्यश्री आत्राम यांचे गावात आगमन होताच पारंपरिक गोंडी नृत्य व ढोलताश्यांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. चिमुकल्यांनी उपस्थितांना गोंडी नृत्याने मंत्रमुग्ध केले.