बेपत्ता जि.प.अभियंत्याचा मृतदेह आढळला महामार्गावरच्या नालीत

अपघाती मृत्यू, की घातपात?

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या आणि दोन दिवसांपासून घराबाहेर असलेल्या अभियंत्याचा मृतदेह शुक्रवारी (दि.29) चंद्रपूर महामार्गावरील नालीत आढळला. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधान आले आहे. अंगावर कुठेही जखमा नसल्यामुळे हा मृत्यू घातपात असण्याची शक्यता नाकारत दारूच्या नशेत उघड्या नालीत कोसळून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

धनपाल उर्फ विजेश भलावी (43 वर्ष) असे त्या मृत अभियंत्याचे नाव आहे. ते मुळचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील रहिवासी होते. मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असताना त्यांना दारूचे व्यसन लागले. त्यामुळे नेहमीच ते दारूच्या नशेत राहात असल्याचे सांगितले जाते.

भलावी यांचे कुटुंबिय रामटेकला गेलेले होते. त्यात बुधवारी सायंकाळपासून ते आपला मोबाईल घरी ठेवून घराबाहेर पडले होते. त्यामुळे पत्नीशी त्यांचा संपर्क होत नव्हता. गुरूवारी रात्री उशिरा पत्नी घरी परतली. पण पतीचा शोध लागला नसल्याने सकाळी त्यांनी पती गायब असल्याची तक्रार पोलिसात केली. यादरम्यान शुक्रवारी दुपारी रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने असलेल्या महामार्गालगतच्या नालीत एका ट्रकचालकाला नालीत बुडालेल्या मृतदेहाचा काही भाग दिसला. त्यानंतर गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

मृतदेहाच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नाही. नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाल्याचे शवपरिक्षणात आढळले. त्यामुळे दारूच्या नशेत रस्त्यालगतच्या नालीत पडून भलावी यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज गडचिरोली ठाण्याचे निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी व्यक्त केला. त्यामुळे तूर्त पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

घातपात तर नाही ना?

भलावी यांचा मृत्यू नेमका कधी झाला? त्या नालीपर्यंत ते कसे गेले? की कोणी दारूच्या नशेत त्यांना त्या नालीपर्यंत आणून नालीत ढकलले, अशा अनेक शक्यतांची उकल करणे बाकी आहे. त्यामुळे हा खरंच एक अपघात आहे, की घातपात याची पडताळणी करून सत्य बाहेर आणण्याचे आव्हान कायम आहे.