आंबे तोडण्यासाठी झाडावर चढणे जीवावर बेतले, खाली पडून इसमाचा मृत्यू

उपचारादरम्यान सोडला जीव

देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथे आंबे तोडण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा झाडावरून पडल्याने जबर मार लागून मृत्यू झाला. तुळशीदास शेंडे (67 वर्ष) असे मृताचे नाव आहे.

तुळशीदास यांच्यासह इतर दोघेजण शेतावर आंबे तोडण्यासाठी गेले होते. तुळशीदास हे आंबे तोडण्यासाठी झाडावर चढले असताना पाय घसरून खाली पडले. त्यात डोक्याला मार लागल्याने त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. तसेच शरीरावर जबर मार लागल्याने ते जखमी झाले. त्या अवस्थेत त्यांना सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घरी आणण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडू लागल्याने उपचाराकरिता देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तुळशीदास यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंड व बराच आप्त परिवार आहे.