आरमोरी : येथील डॅा.सोनाली धात्रक आणि आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात नेमणूक असलेल्या त्यांच्या डॅाक्टर पतीला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि घरात येऊन जबरदस्तीने एक लाख रुपये पळवून नेणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली. हे पाचही जण नागपूर येथील असून एक आरोपी अमित वांद्रे हा न्युज रिपोर्ट नावाचे यु-ट्युब चॅनल चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील काही इसमांनी डॅा.सोनाली धात्रक यांना तुम्ही पती-पत्नी बेकायदेशीर काम करत असल्याने आम्ही तुमची मिडीयामध्ये बदनामी करू, असे धमकावून 5 लाखाच्या खंडणीची मागणी केली. परंतू त्यांना डॅा.धात्रक यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करुन पर्समधील 1 लाख रुपये जबरीने हिसकावून पळ काढला. त्यानंतर उर्वरित 4 लाख रुपयांसाठी फोनवर जिवे ठार मारण्याची धमकी देऊ लागले. त्यावरून आरमोरी पोलिसांनी कलम 395, 450, 385, 506 भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला.
प्रकरणाचे गांभीर्य बघता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन आरमोरी यांचे संयुक्त पथक तयार करून त्यांना नागपूर येथे रवाना केले. या पथकांनी रात्रीच नागपुरात जाऊन कोम्बिंग ऑपरेशन राबवून वेगवेगळ्या परिसरातून आरोपी अमित वांद्रे, दिनेश कुंभारे, विनय देशभ्रतार, रोशन बारमासे आणि सुनील बोरकर या पाच आरोपींना त्यांनी गुन्ह्यातील वाहनासह जेरबंद केले.
यातील काही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याबद्दल पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन आरमोरी येथील संयुक्त पथकाने केली.