देसाईगंज : पत्नीच्या चारित्र्यावरील संशयाच्या भुताने पछाडलेल्या पतीने तिच्या डोक्यावर खलबत्त्याने प्रहार करून विहीरीत ढकलले. यात 32 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.16) देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे घडली. स्नेहा लोकेश बाळबुद्धे असे मृत महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, लोकेश बाळबुद्धे (35 वर्ष) हा पत्नी स्नेहाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत होती. यात तो स्नेहाला मारहाणही करत होता. बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास लोकेश व स्नेहा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी लोकेशचे वडील गुणाजी हे सायकल दुरुस्तीसाठी गेले होते. लोकेशची आई माहेरी गेली होती. लहान मुलगा घरीच दुसऱ्या खोलीत पलंगावर झोपलेला, तर मोठा मुलगा शाळेत गेला होता. त्यामुळे पती-पत्नीमधील भांडणात लोकेशने घरातील खलबत्ता उचलून स्नेहाच्या डोक्यावर प्रहार केले. यामुळे स्नेहा गंभीर जखमी होऊन खाली कोसळली. डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यामुळे लोकेशने तिला उचलून घराबाहेरील चौकात असलेल्या विहिरीत नेऊन टाकले. यानंतर स्वतः देसाईगंज पोलिसांसमोर जाऊन पत्नीला मारल्याची कबुली दिली. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली.
विशेष म्हणजे लोकेशला दारूचे व्यसन होते. या दाम्पत्याला दोन मुले असून त्यातील मोठा मुलगा 6 वर्षाचा तर लहान मुलगा 3 वर्षाचा आहे. आईच्या अशा अकाली मृत्यूने दोन्ही मुलांबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली देसाईगंजचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.