रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात 30 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती

119 टक्के उद्दीष्ट पूर्ण, 83 कोटींचे वाटप

गडचिरोली : रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सन 2023-24 मध्ये 2.16 लाख नोंदणीकृत जॉबकार्डधारक कुटुंबातील 1.83 लक्ष नोंदणीकृत मजुरांना 26.45 लक्ष मनुष्य दिवस उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले असून 30.03 लक्ष मनुष्य दिवस इतकी रोजगार निर्मिती झाली आहे. त्याची टक्केवारी 119.03 इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय मिना यांनी दिली.

विशेष म्हणजे या रोजगार निर्मितीमुळे मजुरांच्या स्थलांतरावर नियंत्रण आले आहे. याकरीता मजुरांना 83 कोटी 10 लाख 21 हजार रुपये इतके मजुरीचे वाटप बँक व पोस्ट खात्यातून करण्यात आले आहे. मनुष्य निर्मिती दिवसापैकी 38.73 टक्के हे अनुसूचित जमाती, 10.51 टक्के अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता मनुष्यदिन निर्मिती झाली आहे. एकूण मनुष्यदिन निर्मितीपैकी महिलांकरीता 48.95 टक्के मनुष्यदिन निर्मिती झाली.

एकूण झालेल्या कामांपैकी 64.01 टक्के इतका खर्च कृषी व कृषी आधारीत कामावर करण्यात आला आहे. यावर्षीच्या अतिवृष्टीचे स्वरुप पाहता आगामी कालावधीत मग्रारोहयोवर मजुरांचे येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे गृहीत धरून त्यानुसार वार्षिक नियोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 अमृत सरोवर निर्मितीचे उद्दिष्ट जिल्ह्यास दिले होते. गडचिरोली जिल्ह्याने 110 अमृत सरोवर पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण केले आहे. पूर्ण झालेल्या अमृत सरोवर किनाऱ्यावर 1 मे 2023 व 15 ऑगस्ट 2023 रोजी विविध कार्यक्रम राबविण्यासह ध्वजारोहण करण्यात आले. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस सुद्धा अमृत सरोवरांवर उत्साहाने साजरा करण्यात आल्याचे प्रशासनाने कळविले. जिल्ह्यात “मेरी मिट्टी मेरा देश” उपक्रमाअंतर्गत 458 ग्रामपंचायतींमध्ये 75 देशी झाडांची लागवड करण्यासह शिलाफलक तयार करून पंचप्रण शपथ घेण्यात आली, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक गडचिरोली यांनी कळविले आहे.