– तर भंग होऊ शकते लेडी ड्रायव्हर किरणचे इंग्लंडमध्ये शिकण्याचे स्वप्न

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही प्रक्रिया संथ

गडचिरोली : गडचिरोलीच्या दुर्गम भागात राहून इंग्लंडमध्ये उच्चशिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या किरण कुर्मावार या युवतीची स्वप्नपूर्ती करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला शिष्यवृत्ती देण्याचे निर्देश समाजकल्याण विभागाला दिले. पण महिनाभराचा कालावधी पूर्ण झाला तरीही ही प्रक्रिया पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयाने पूर्ण केली नाही. दुसरीकडे प्रत्यक्ष शिष्यवृत्ती मिळणे, इंग्लंडमधील कॅालेजला प्रवेश घेणे, व्हिसा मिळवणे या प्रक्रियेसाठी किरणकडे अवघे २० दिवस शिल्लक आहेत. अशा स्थितीत आपले हे स्वप्न भंग तर होणार नाही ना, अशी भितीयुक्त व्यथा किरणने ‘कटाक्ष’सोबत बोलताना व्यक्त केली.

सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा या दुर्गम भागातील रहिवासी असलेली किरण लेडी ड्रायव्हर म्हणून ओळखल्या जाते. आपल्या वडिलांना प्रवासी टॅक्सी चालविण्यात हातभार लावत तिने हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून एमए (इकॅानॅामिक्स)चे शिक्षण पूर्ण केले. किरणला आता इंग्लंडमध्ये उच्चशिक्षण घ्यायचे आहे. गेल्या ७ महिन्यांपासून ती त्यासाठी लागणाऱ्या शासकीय आर्थिक मदतीसाठी धडपड करीत आहे. अखेर तिने थेट मुंबई गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मिळवली. त्यांनी किरणची तळमळ समजून घेऊन समाजकल्याण विभागातून तिला इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी लागणारी शिष्यवृत्ती देण्याचे निर्देश दिले.

इंग्लंडची राजधानी लंडन येथे इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी किरणने अर्ज केला. पण त्यासाठी ४० लाखांचा खर्च असल्याने समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती मिळाल्याशिवाय तिची पुढील कोणतीच प्रक्रिया पूर्ण होणार नाही. मुख्यमंत्र्यांचा निरोप मिळताच गडचिरोलीच्या विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॅा.सचिन मडावी यांनी तिचा प्रस्ताव पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयाकडे तातडीने पाठविला. मात्र पुणे येथून पुढील प्रक्रिया होण्याची आम्ही प्रतीक्षा करीत असल्याचे डॅा.मडावी यांनी सांगितले.

लालफितशाहीत अडकलेला किरणच्या शिष्यवृत्तीचा प्रस्ताव तातडीने मार्गी लागून तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तातडीने हालचाली करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा किरणचे हे स्वप्न, मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश हे सर्वकाही व्यर्थ जाणार आहे.