गोंडवाना विद्यापीठातून गुंजणार राष्ट्रसंतांच्या प्रेरणादायी भजनांसह ग्रामगीतेचे तत्वज्ञान

तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन

गडचिरोली : लढाईच्या काळात सीमेवर जाऊन प्रेरणादायी भजनांनी सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या, 50 वर्षांपूर्वी लिहिलेल्या ग्रामगीतेच्या तत्वज्ञानातून आजच्या काळातही मार्गदर्शक ठरेल असे विचार मांडणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरील अध्यासन केंद्राचे उद्घाटन गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात ज्येष्ठ गुरूदेव सेवक प्रकाश महाराज वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॅा.श्रीराम कावळे, कुलसचिव डॅा.अनिल हिरेखण, अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष जनार्दनपंथ बोथे, रवी भुसारी, गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष डॉ.शिवनाथ कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुख्य वक्ते म्हणून बोलताना प्रकाश महाराज वाघ यांनी राष्ट्रसंतांचे विचार प्रत्येक पिढीसाठी कसे मार्गदर्शक आहेत याकडे लक्ष वेधले. महाराजांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 165 ग्रंथांची साहित्य संपदा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या साहित्याचे वाचन प्रत्येकाने करायला हवे. शिक्षकांनी आपल्याकडील ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये ओतावे, स्वतःच्या चांगल्या कर्माने स्वतःची ओळख तयार करावी. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंतांच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक / सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. त्यांचे विचार प्रत्येक पिढीसाठी कसे महत्त्वाचे आहे, याबाबत सांगून त्यांच्या जीवनकार्याच्या अनेक पैलूवर वाघ यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले, महाराजांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचतील. त्यांच्या विचाराने येणाऱ्या पिढीला कशी वाट दाखवता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक या केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.विनायक शिंदे यांनी, संचालन प्रा.डॉ.निळकंठ नरवाडे यांनी तर आभार प्रा.हेमराज निखाडे यांनी मानले. या अध्यासन केंद्राच्या सल्लागार मंडळात डॉ.नामदेव कोकडे, अॅड.गोविंद भेंडारकर, गोपाळ कडू, प्रा.अशोक चरडे, सुभाष लोहे आदींचा समावेश आहे.