गडचिरोली : ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (युआयटी), गडचिरोलीच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी म्हणून तुमच्यावर विशेष जबाबदारी आहे. तुमची कामगिरी, यश आणि भविष्यातील उपलब्धी यातूनच या संस्थेची ओळख निर्माण होणार आहे. पुढील बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी तुमची कामगिरी प्रेरणा आणि मापदंड ठरेल. त्यामुळे उपलब्ध शैक्षणिक संधींचा पुरेपूर उपयोग करून तांत्रिक ज्ञान, व्यावहारिक कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठद्वारा संचालित युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (युआयटी), गडचिरोली येथे शैक्षणिक सत्र 2026-27 मधील बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दीक्षा आरंभ’ (इन्डक्शन प्रोग्रॅम) कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, युआयटीचे प्रभारी मनिष उत्तरवार, लॉयड्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय गुप्ता यांच्यासह युआयटीचे अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
बारावीनंतर शालेय शिक्षणातून व्यावसायिक शिक्षणाकडे होणारे संक्रमण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पंडा म्हणाले, हे अंतर प्रभावीपणे भरून काढण्यासाठी युआयटी विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. संस्थेत व्यावहारिक आणि तांत्रिक शिक्षणावर विशेष भर देण्यात येत असून चार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.
दोन महिन्यांच्या इंटर्नशिपमधून उद्योगांचा अनुभव
युआयटीमधील चार वर्षांचा शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यावसायिक जडणघडणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत दोन महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. याद्वारे उद्योगांमधील प्रत्यक्ष कामकाज, तांत्रिक प्रक्रिया आणि व्यावसायिक कार्यसंस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी व्यापक आहेत. लॉयड्ससह अन्य कंपन्या आणि विविध उद्योगांमध्येही विद्यार्थ्यांना आपले करिअर घडविण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्याचे ध्येय न ठेवता उद्योगांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार आपली तांत्रिक व व्यावहारिक कौशल्ये विकसित करावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पहिल्या बॅचवर संस्थेच्या प्रतिष्ठेची जबाबदारी
युआयटीच्या पहिल्या बॅचला विशेष महत्त्व असल्याचे नमूद करताना जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीवरून भविष्यात या संस्थेची ओळख निर्माण होणार आहे. पहिल्या बॅचने केलेली शैक्षणिक प्रगती, मिळविलेले रोजगार, विविध क्षेत्रांतील यश आणि उपलब्धी यापुढील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या प्रगतीसोबत संस्थेच्या प्रतिष्ठेत भर घालण्याचे ध्येय ठेवावे. गोंडवाना विद्यापीठ हे युआयटीचे पालक विद्यापीठ असून संस्थेला आवश्यक शैक्षणिक मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. युआयटीचे संचालकही संस्थेच्या शैक्षणिक विकासासह विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सक्रियपणे प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
पाच वर्षांत युआयटीला प्रतिष्ठित संस्था बनविण्याचे ध्येय
येत्या पाच वर्षांत युआयटीने या भागातील विकसित आणि प्रतिष्ठित तंत्रशिक्षण संस्थांपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी पंडा यांनी व्यक्त केली. संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक असून आवश्यक सहकार्य केले जाईल. विद्यार्थी, शिक्षक, विद्यापीठ, उद्योग आणि प्रशासन यांच्या समन्वयातून युआयटीच्या विकासाला अधिक गती मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी संस्थेत उपलब्ध असलेल्या सुविधा, प्राध्यापकांचे मार्गदर्शन, इंटर्नशिप आणि उद्योग क्षेत्राच्या संपर्काचा जास्तीत जास्त उपयोग करावा. चार वर्षांच्या शिक्षणानंतर प्रत्येक विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या सक्षम, व्यावहारिक कौशल्यांनी परिपूर्ण आणि आत्मविश्वासाने करिअरच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास सज्ज असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मोनिका मडावीच्या क्रीडा कामगिरीचा गौरव
या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लॉयड्स स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या मोनिका सानू मडावी हिचा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मोनिकाने 40 व्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील 20 वर्षांखालील वयोगटात पोल व्हॉल्ट प्रकारात सुवर्णपदक, तर उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. पोल व्हॉल्टमध्ये सुवर्णपदक मिळविणारी ती गडचिरोली जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. मोनिकाच्या यशाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये मोठी क्षमता असल्याचे सांगितले. लॉयड्स फाउंडेशनच्या माध्यमातून खेळाडूंना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. गडचिरोली शहरात खेळाडूंसाठी सुसज्ज ॲथलेटिक ट्रॅक उभारण्यास राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून क्रीडा संकुल, कबड्डी व खो-खो मैदाने तसेच खेळाडूंसाठी वसतिगृहासह आवश्यक क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले.
‘दीक्षा आरंभ’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नवप्रविष्ट विद्यार्थ्यांना युआयटीची शैक्षणिक व्यवस्था, अभ्यासक्रम, उपलब्ध सुविधा, व्यावहारिक प्रशिक्षण तसेच भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला युआयटीचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































