गडचिरोली : शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेनुसार, हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्या पुनर्वसनासह मुख्य प्रवाहात समावेशाच्या उद्देशाने काल 1 सप्टेंबर 2026 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजिवनी’ अंतर्गत 14 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना भुखंड वितरण करण्यात आले. तसेच इतर आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना पुनर्वसन निधी धनादेशासोबत विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने आत्मसमर्पित माओवाद्यांचे सर्वंकष पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण 819 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. योजनेअंतर्गत आत्मसमर्पित त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी भूखंड, घरकुल, रोजगार, आरोग्य या विविध आयामांच्या अनुषंगाने मदत केली जात असते. याच प्रयत्नाअंतर्गत जिल्हा प्रशासन व गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयातून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी आतापर्यंत एकूण 174 भुखंड मंजूर झाले आहेत. त्यापैकी 153 भुखंडांचे वाटप याआधी करण्यात आले आहे. कालच्या कार्यक्रमादरम्यान एकूण 14 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत भुखंडाचे वितरण करण्यात आले.
या सर्व 14 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात येऊन त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यासोबतच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या मुलांना सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासोबतच माओवादी सदस्यांना वाहन चालक परवान्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनाकडून करण्यात येईल, तसेच आत्मसमर्पितांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध राहील असे सांगितले. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध पुनर्वसन उपक्रमांच्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी व स्वयंरोजगाराशी संबंधित सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन समाजात सन्मानाने जीवन जगावे’, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता, विकास व प्रगतीचा मार्ग स्वीकारणाया आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचे कौतुक करुन त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम., सहाय्यक जिल्हाधिकारी अजय डोके, पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील ऊईके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि.नरेंद्र पिवाल, मपोउपनि. प्रतीक्षा राठोड व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.
































