कुदुर्शी (टोला) येथे कबड्डी स्पर्धेचा समारोप, विजेत्यांना बक्षीस वितरण

युवांनी क्रीडा संस्कृती जोपासावी- नेते

चामोर्शी : तालुक्यातील जय गुरुबाबा मंडळ कुदुर्शी (टोला) यांच्या सौजन्याने खुला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात विजेत्या संघांना माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी नेते यांनी कबड्डी या भारतीय पारंपरिक खेळाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत युवा पिढीला क्रीडा संस्कृतीशी जुळण्याचे आणि ही संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. ही स्पर्धा खेळाडूंच्या क्रीडा प्रतिभेला चालना देणारी असून, भविष्यात कुदुर्शी गावात अशाच स्पर्धांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा नेते यांनी व्यक्त केली.

या बक्षीस वितरण कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे यांच्यासह मंडळाचे रंजित रबळे, किरण पेळे, निरायण बन्शी, कैलास सिर्ग्गावार व गावातील प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते तथा क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.