विविध उपक्रमांनी साजरा झाला डॅा.साळवे नर्सिंग कॅालेजचा महोत्सव

नृत्य, वादविवाद स्पर्धेसह नेत्र तपासणी

रुग्णांची नेत्र तपासणी करताना वैद्यकीय चमू

धानोरा : चातगाव येथील डॅा.साळवे नर्सिंग कॅालेजमधील स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ओपन टॅलेंट महोत्सवाचा समारोप झाला. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या या महोत्सवात एकल आणि समुह नृत्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी कला आणि वैचारिक प्रगल्भतेचा परिचय दिला. याशिवाय गावातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिरही घेण्यात आले.

या दोन दिवसीय महोत्सवाची सुरूवात शनिवारी नृत्य स्पर्धेने झाली. त्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून यशोदा हॅास्पिटलचे संचालक डॅा.राज देवकुले, चातगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अजय जाधव, कॅालेजचे अध्यक्ष डॅा.प्रमोद साळवे, कोषाध्यक्ष डॅा.अमित रामने, माजी सरपंच नारायण सयाम, माजी सरपंच प्रतापशहा मडावी, माजी सरपंच पांडूरंग कुमरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष विनायक सोरते आदी उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना रविंद्र वासेकर म्हणाले, जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात डॅा.साळवे नर्सिंग कॅालेजने सर्वप्रथम महाविद्यालयाची सुरूवात करून या जिल्ह्यात नर्सिंग कॅालेजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण केले. त्यांच्यामुळे या जिल्ह्यातील नर्सेसचा अनुशेष संपला आणि आरोग्य क्षेत्र बळकट झाले. याशिवाय ओपन टॅलेन्ट कॅान्टेस्ट व इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास साधण्यात येत आहे ही भूषणावह बाब असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकता डॅा.प्रमोद साळवे म्हणाले, गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल, दुर्गम भाग असला तरी येथील मुली व महिला कौशल्याच्या बाबतीत इतरांपेक्षा कुठेही मागे नाहीत. त्यांना फक्त प्रोत्साहन आणि व्यासपीठाची गरज आहे. त्यामुळेच ओपन टॅलेन्ट कॅान्टेस्टसारखे उपक्रम दरवर्षी राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी इतर पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन निकीता सडमेक यांनी तर आभार प्रदर्शन श्रीशा अल्लूर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सानू कोंडागोर्ला, सानिया सडमेक, शिल्पा गावडे, प्रशांत कोंडागुर्ला, नितीन अल्लूर, पियुष नंदेश्वर, वैशाली पिपरे, स्विटी नरोटे, इंदू चिपेली, सानिया बेडकी, श्रद्धा कुनघाडकर, राखी मोगरकर, खोमेश बोभाटे, ताजिसा कोडाप, राज अल्लुर, आकांक्षा आखाडे, शुभांगी तुलावी इत्यादींनी सक्रिय सहकार्य केले. नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून ईशा बैस व शुभांगी हलामी यांनी काम पाहिले.

वादविवाद स्पर्धेतून ज्वलंत प्रश्नावर मंथन

रविवारी जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नावर खुल्या वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता लोहखनिज प्रकल्प मारक की तारक?’ असा स्पर्धेचा विषय होता. त्यावर दोन्ही बाजुने स्पर्धकांनी आपले मत मांडून वैचारिक परिपक्वतेचा परिचय दिला. जिल्ह्याशी संबंधित ज्वलंत प्रश्नांवर दरवर्षी अशा स्पर्धेचे आयोजन केले जाईल, असे यावेळी डॅा.प्रमोद साळवे यांनी जाहीर केले.

सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी संजय तिपाले तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, लोकशाही मराठीचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर काथवटे, सामाजिक कार्यकर्ते तथा कंत्राटदार निंबाळकर, व्यापारी संघटनेचे रवी चन्नावार यांच्यासह गावातील पदाधिकारी उपस्थित होते.