चारित्र्यावरील संशयातूनच त्याने पत्नीवर मध्यरात्री चाकूने केले सपासप वार

युवती सेनेच्या प्रमुखाची हत्या प्रकरण

कुरखेडा : येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत ताहेमिम शेख (३० वर्ष) यांची दोन दिवसांपूर्वी हत्या करून पोलिसांपुढे शरण गेलेल्या पतीने या घटनेमागील आपला राग नेमका काय होता हे उघड केले. पत्नीच्या चारित्र्यावर त्याला संशय येत होता आणि त्या रागातूनच त्याने मध्यरात्री पत्नी राहत हिच्यावर चाकुने अनेक वार करून तिला संपविले. हा थरार घडला त्यावेळी त्यांची दोन मुलेही घरातच झोपून होती हे विशेष.

मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेला आरोपी ताहेमिम वजीर शेख मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रजेगावचा रहिवासी होता. पण लग्नापासून तो सासरी कुरखेडा येथे राहात होता. गुरूवारच्या मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास त्याने पत्नीवर चाकूने वार करून आपल्या मनातील भडास काढली.

आरोपी ताहेमिम हा छत्तीसगडमध्ये हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटकेत होता. तेथून १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आलेला होता. पण तेव्हापासून त्याचा संशयी स्वभाव वाढला होता. पोलिसांनी त्याचा तीन दिवसांचा पीसीआर मिळवला होता. सोमवारी पीसीआरचा शेवटचा दिवस आहे.