गोसेखुर्दचा फटका, सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सहा मार्ग बंद

विसर्गात घट, सोमवारी पूर ओसरणार

गडचिरोली : गोसेखुर्द धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह काही उपनद्यांना आलेल्या पुराचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसला आहे. पुराचे पाणी पुलांवरून वाहात असल्याने शनिवारी संध्याकाळपर्यंत ७ मुख्य मार्गांवरील वाहतूक बंद झाली होती. रविवारी दिवसभर ही स्थिती कायम होती. मात्र रविवारी संध्याकाळी ६ मार्ग बंद असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

बंद असलेल्या मार्गांमध्ये गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (तालुका गडचिरोली), गडचिरोली-चामोर्शी-आष्टी (तालुका गडचिरोली), आलापल्ली-आष्टी-गोंडपिपरी (चामोर्शी तालुका), अहेरी-मोयाबीनपेठा- वटरा (वटरा नाला, तालुका अहेरी), भेंडाळा-गणपूर बोरी (तालुका चामोर्शी) आणि शंकरपूर हेटी-मार्कन्डादेव-फराडा-मोहोली-रामाळा- घारगांव-दोडकुली-हरणघाट रस्ता (तालुका चामोर्शी) या मार्गांचा समावेश आहे.

मुख्य मार्ग बंद असल्याने अनेक बसफेऱ्या रद्द तर काही फेऱ्या दुसऱ्या मार्गाने वळत्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी देसाईगंजच्या हनुमान वॅार्ड आणि सावंगीसह गडचिरोली तालुक्यातील कोटगल क्षेत्रातील मिळून १९९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आरमोरी येथे एसडीआरएफची चमुही तैनात ठेवण्यात आली आहे.

दरम्यान गोसेखुर्दमधील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे रात्रभरात पुराची पातळी कमी होऊन सोमवारी अनेक मार्ग सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.