आमगावच्या ‘त्या’ कुटुंबियांना महिला काँग्रेसची सांत्वनपर भेट

गडचिरोली : काही दिवसांपूर्वी वादळी पावसादरम्यान आकाशातून पडलेल्या विजेच्या धक्क्याने आमगावच्या भारत लक्ष्मण राजगडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या कुटुंबातील इतर सदस्यांची महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष अॅड.कविता मोहरकर,किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वामनराव सावसाकडे,ओबीसी काँग्रेसचे जिल्हा सचिव मनोज ढोरे, काँग्रेस नेत्या जयमाला पेंदाम,पुष्पलता कोहपरे यांनी सांत्वनपर भेट घेऊन त्यांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंची कीट दिली.
गेल्या २४ एप्रिल रोजी भारत राजगडे, त्यांची पत्नी अंकिता, मुलगी देवांशी व मनस्वी हे एक लग्न समारंभ आटोपून परत गावाकडे जात असताना देसाईगंजजवळच्या तुळशी फाट्याजवळ वादळ आल्याने त्यांनी झाडाखाली आसरा घेतला होता. मात्र काळाने घाला घातला आणि राजगडे कुटुंबियांवर वीज कोसळून कुटुंबातील चारही जण जागीच गतप्राण झाले. या घटनेनंतर महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष अॅड.कविता मोहरकर यांनी मृतक भारत राजगडे यांची आई पुष्पा लक्ष्मण राजगडे यांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी बहिण अंजु गडपायले, प्रिती केळझरकर स्मिता भोसकर यांच्या उपस्थितीत आईला जीवनावश्यक वस्तूंची किट दिली. यावेळी गावातील गोपाळ विधाते, ओम ठाकरे यांच्यासह इतर गावकरी उपस्थित होते.