मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शाळा-वसतिगृहांचे उद्घाटन

गडचिरोली : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी (दि.८) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त विविध सरकारी शाळा आणि वसतिगृहांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 11 वाजता शासन आपल्या दारी या कार्यक्रमास एम.आय.डी.सी.मैदान, कोटगुल रोड, गडचिरोली येथे उपस्थित राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत) गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चामोर्शी या दोन वसतिगृह व एका शासकीय निवासी शाळा इमारतींचे ऑनलाईन उद्घाटन करतील.

त्यानंतर शासन आपल्या दारी या कार्यक्रमास मुख्यमंत्री यांचेसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, विधानसभा सदस्य डॅा.देवराव होळी, विधानसभा सदस्य कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

हे मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त ८ जुलै रोजी काही मार्गावरील वाहतूक सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरक्षेच्या दृष्टिने नागरिकांसाठी बंद राहणार आहे. त्यात कोटगल टी-पॅाईंट ते कोर्ट टी-पॅाईंट, एमआयडीसी मार्ग, शासकीय विश्रामगृह मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग, आणि कॅाम्प्लेक्स रोड हे मार्ग ८ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या हरदारीसाठी बंद राहतील. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.