Home दैनंदिन बातम्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून एम.रमेश यांची नियुक्ती

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून एम.रमेश यांची नियुक्ती

नीलोत्पल यांची कोल्हापूरला बदली

गडचिरोली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली पोलीस दलाला शिस्त लावण्यासोबत नक्षलविरोधी अभियान आक्रमकपणे राबविणारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीतच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) या पदाची जबाबदारी सांभाळणारे एम.रमेश यांना बढती देण्यात आली.

गेल्या तीन वर्षात पोलीस अधीक्षक म्हणून नीलोत्पल यांनी नक्षलविरोधी अभियान अधिक प्रभावीपणे राबवत अटक, आत्मसमर्पण आणि समोरासमोरच्या लढाईत माओवाद्यांना झुकण्यास भाग पाडले. छत्तीसगड सीमेकडील अतिसंवेदनशिल अशा दुर्गम भागातील जंगलात तीन वर्षात 11 नवीन पोलीस मदत केंद्रांची उभारणी त्यांच्या कार्यकाळात झाली. त्यामुळे माओवाद्यांना लपण्यासाठीही जागा शिल्लक उरली नाही. यासोबत बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण, आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी साक्षरता वर्गापासून तर त्यांना नोकरीला लावून देण्यापर्यंत विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.

एम.रमेश यांना बढती

अपर पोलीस अधीक्षक म्हणून सुरूवातीला अहेरी उपमुख्यालयात सेवा दिल्यानंतर एम.रमेश यांच्याकडे प्रशासन आणि नंतर नक्षलविरोधी अभियान अशा विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. त्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा लाभ पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळताना होणार आहे. आता माओवाद्यांचे अस्तित्व संपुष्टात आले असले तरी पुन्हा ही चळवळ डोके वर काढणार नाही यासाठी आणि दुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समन्वयकाच्या भूमिकेत त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे.