‘त्या’ हल्लेखोर वाघाला लवकर जेरबंद करा

खासदार अशोक नेते यांचे वनाधिकाऱ्यांना निर्देश, कुटुंबियांना पाच लाखांची मदत

प्रेमिला रोहणकर यांच्या कुटुंबियांना पाच लाखांचे धनादेश देताना खासदार अशोक नेते.

गडचिरोली : सावली तालुक्यातील वाघोली (बुट्टी) येथील प्रेमिला मुकरू रोहणकर (५० वर्ष) ही महिला शेतशिवारात काम करीत असताना शनिवारी सकाळी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून तिला ठार केले. खासदार अशोक नेते यांनी त्याच दिवशी प्रेमिला यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत वनविभागाकडून दिल्या जाणारा पाच लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश कुटुंबियांना सुपूर्द केला. महिनाभरात दोन महिलांचा बळी घेणाऱ्या त्या हल्लेखोर नरभक्ष्यी वाघाला जेरबंद करून भविष्यातील बळी रोखावे, असे निर्देश यावेळी खा.नेते यांनी वन अधिकाऱ्यांना दिले.

वाघोली बुट्टी येथे झालेल्या या घटनेची माहिती भाजपच्या ओबीसी मोर्चाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांना दिली. याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार नेते यांनी दूरध्वनीद्वारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यामुळे तातडीने रोहणकर कुटुंबियांना मदतीचा धनादेश देण्यात आला. याशिवाय खा.नेते यांनी स्वतःकडूनही काही मदत या कुटुंबियांना दिली.

गावकऱ्यांशी केली चर्चा
यापूर्वी २६ एप्रिल २०२३ ला वाघोली बुट्टी याच गावातील ममता हरिचंद्र बोदलकर यांचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचीही खासदार नेते यांनी सांत्वनपर भेट घेऊन आर्थिक मदत दिली.तसेच वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किशोर गोवर्धन यांनासुद्धा याप्रसंगी आर्थिक मदत दिली. याप्रसंगी नेते यांनी गावातील विविध समस्यांसंदर्भात, तसेच वाघाच्या दहशतीसंबंधी गावकऱ्यांसोबत चर्चा केली.यावेळी मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, विभागीय वनअधिकारी खाडे, क्षेत्र सहाय्यक येडे, सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी विरुळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनोद धोटे, वाघोली बुट्टीचे उपसरपंच नितीन कारडे, सभापती हिवराज शेरकी, माजी सरपंच टिकाराम रोहणकर, तुळशीराम रोहणकर, होमदेव मेश्राम, कुमार रोहणकर, सुखदेव बोदलकर, व्याहाड बुजचे ग्रा.पं.सदस्य दिवाकर गेडाम, ग्रा.पं.सदस्य वैशाली निकेसर, मनिष रक्षमवार, घोटचे जि.प.सदस्य सोनटक्के, तुळशीराम भुरसे, अरविंद निकेसर, संदीप सातपैसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.