धानोरा : तालुक्यातील मुरुमगांव येथे आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना मुरूमगाव यांच्या वतीने शहिद शिरोमणी गेंदसिंह बलिदान दिवसानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन दि.२० जानेवारीला करण्यात आले होते. शहीद गेंदसिंह व बिरसा मुंडा चौक, मुरूमगांव येथे आयोजित या कार्यक्रमाला अतिथी म्हणून भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. या समाजाच्या विकासासाठी शासनस्तरावर अनेक योजना कार्यान्वित करून अंमलात आणल्या आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आपल्या स्तरावर प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीपदावर द्रोपदी मुर्मू यांच्या रुपाने पहिल्यांदा आदिवासी समाजाच्या महिलेला विराजमान करण्यासाठी पुढाकार घेतला. खऱ्या अर्थाने आपल्या आदिवासी समाजाला मिळालेला हा बहुमान आहे. येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या औचित्याने आपण दिवाळीसारखा सण साजरा करावा. प्रत्येकाने आपल्याला घरोघरी दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन यावेळी खा.नेते यांनी केले.
रेल्वेसंबंधी अनेक रखडलेली कामे मी मार्गी लावली आहेत. एवढेच नाही तर धानोरा, मुरूमगाव, भानुप्रतापपूर आणि छतीसगडपर्यंत जाणारी नवीन रेल्वे लाईन मंजूर करून घेतली आहे. त्याचबरोबर अनेक रस्त्यांची विकासात्मक कामे केली आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही समस्या माझ्यापर्यत आल्या. येथील सामाजिक समस्या समजून घेऊन निश्चितच त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले.
याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष साईनाथ साळवे, तालुकाध्यक्ष लता पुंघाटे, ब्लॅाक अध्यक्ष मनिराम रावटे, माजी पं.स.सभापती अजमन रावटे, तालुका महामंत्री विजय कुमरे, माजी पं.स.सदस्य हिरामण हरामी, ठाणेदार मिथुन सिरसाट, प्रा.आरोग्य केंद्राचे डॉ.बनसोड, जयलाल मार्गिया, तुळशीराम कोरेटी, श्रावणजी हरामी, मदन बढई, नरेंद्र आत्राम, भुपेंद्रशाह मडावी, ब्लॅाक उपाध्यक्ष बैसाखुराम कोटपरिया, सचिव सरादु चिराम, कोषाध्यक्ष दयाराम कवलिया तसेच मोठ्या संख्येने आदिवासी महिला, बांधव उपस्थित होते.