श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सिरोंचात विठ्ठलेश्वर मंदिराकडून विविध कार्यक्रम

कलश यात्रेत भाग्यश्री आत्राम सहभागी

सिरोंचा : अयोध्या येथे नवनिर्मित मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शनिवारी (दि.२०) विठ्ठलेश्वर मंदिर ट्रस्टकडून सिरोंचा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कलश यात्रेने सर्वांचे लक्ष वेधून गेले.

परिसरातील महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून कलश हाती घेऊन श्री भक्तांजनेया मंदिर, श्री अय्यप्पा मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिराला भेट देऊन विठ्ठलेश्वर मंदिरात श्रीरामचंद्र प्रभुला जलाभिषेक केला.

भव्य कलश यात्रेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम सहभागी झाल्या होत्या. यासोबत इतरही धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.