कॅम्प एरियात उभारले शहीद जवान वीर अजय उरकुडे यांचे स्मृतीस्थळ

खा.अशोक नेते यांच्या हस्ते अनावरण

गडचिरोली : शहरातील कॅम्प एरियात शहीद जवान अजय उरकुडे यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले. त्याचे अनावरण खासदार अशोक नेते यांच्या हस्ते सोमवारी (दि.४) करण्यात आले. शहीद उरकुडे हे कॅम्प एरियातील रहिवासी होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, तर प्रमुख अतिथी म्हणून वीरमाता शांताबाई उरकुडे, भाजपचे लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, हेमंत जंबेवार, अविनाश पाल, डी.डी. सोनटक्के, अजय बर्लावार, प्रकाश नंदनवार, सिंधुताई गिरडकर, विजय उरकुडे, स्व.वीर अजय उरकुडे कॅान्व्हेंटचे शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि उरकुडे परिवारातील सर्व सदस्य तथा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी खा.नेते म्हणाले, देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करणारे जवान खर्‍या अर्थाने देशसेवा करत आहेत. मातृभूमीच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी बलिदान देतात. शहीद अजय उरकुडे हे त्यापैकीच आहेत. अशा सर्व शहीद जवानांप्रती मी आदर व्यक्त करतो. वीर अजय उरकुडे यांचे स्मारक गडचिरोलीतील तरुणांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी खासदार नेते यांनी‌ केले. याप्रसंगी प्रकाश ताकसांडे यांनी स्मारकाच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली. उपस्थित इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.