मातृभाषेतून शिक्षण घ्या, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आवाहन

गोंडवाना विद्यापीठाला दिली सदिच्छा भेट

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला ‘मिशन लाइफ’चा नारा दिला आहे. मिशन लाईफ ही भारताच्या नेतृत्वाखालील जागतिक जण चळवळ आहे, जी पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्यासाठी वैयक्तिक तसेच सामुदायिक कृतीला प्रोत्साहन देते. या चळवळीत सहभागी व्हा, असे आवाहन केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून मातृभाषेतून शिक्षण घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

केंद्रीय कामगार व स्वयंरोजगार, तथा पर्यावरण, वन व हवामान बदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी शुक्रवारी (दि.२३) गोंडवाना विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, प्र-कुलगुरू श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, मानव विज्ञान केंद्राचे अधिष्ठाता डॉ.चंद्रमौली, नव संशोधन केंद्राचे संचालक मनीष उत्तरवार, उपवनसंरक्षक मिलेश शर्मा तसेच प्रशासनाचे इतर अधिकारी, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रममधील वनवासी हितरक्षाचे प्रमुख गिरीश कुबेर, सृष्टी संस्थेचे संचालक केशव गुरनुले, प्रा.रुपेंद्र गौर आणि ग्रामसभांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक दायित्वातून सुरू केलेल्या ग्रामसभा क्षमता सक्षमीकरण व प्रशिक्षण केंद्राविषयी माहिती दिली. तसेच पेसा कायदा म्हणजे, जैवविविधता, मनरेगा अशा सगळ्या गोष्टी ग्रामस्थांना अवगत होण्यासाठी हा प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘विद्यापीठ आपल्या गावात’ या उपक्रमाविषयी त्यांनी मंत्र्यांना माहिती दिली. ना.यादव यांनी काही उपक्रमांचे कौतुक करून विद्यापीठाला शुभेच्छा दिल्या.

एकल प्रकल्पाच्या नोडल अधिकारी चेतना लाटकर, तसेच नियाज मुलानी यांनी संयुक्तरित्या ग्रामसभेचे क्षमता सक्षमीकरण आणि ग्रामसभांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी कसे प्रयत्न केले जातात याविषयी माहिती दिली. तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी ज्या लोकांना सामूहिक वनहक्क प्राप्त झाले आहे अशा वनभूमीचे सीमांकन करणे, शासन दरबारी नोंद होणे, वनविभागाचा निधी ग्रामसभांना सरळ देता येईल यासाठी कार्यवाही करणे, अशा मागण्यांचे निवेदन ना.यादव यांना सादर केले. तसेच सृष्टी आणि दिनबंधू समाज विकास संस्था देवरी यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. या बैठकीचे संचालन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी केले.