अन् खासदार-आमदारांनी गडचिरोलीच्या रस्त्यावर स्वतः चालवली बाईक

भूपेंद्र यादव यांच्या प्रथम आगमनानिमित्त रॅली

गडचिरोली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव शुक्रवारी प्रथमच गडचिरोलीत आले. गोंडवाना विद्यापीठाच्या ग्रामसभा संवाद कार्यक्रमानिमित्त आलेल्या ना.यादव यांच्या स्वागतासाठी भाजपच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे स्वतः खासदार अशोक नेते यांनी बाईक चालवत या रॅलीचे नेतृत्व केले. आमदार डॅा.देवराव होळी हेसुद्धा यात सहभागी झाले.

सध्या भाजपकडून मोदी @ 9 अंतर्गत जोमाने जनसंपर्क अभियान सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दाखल झालेले पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री भूपे्ंद्र यादव यांचे स्वागत बाईक रॅलीने करण्यात आले. रॅलीचा शुभारंभ कॉम्प्लेक्स परिसरातील कोर्ट चौकात ना.भूपेंद्र यादव आणि खासदार अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी विविध जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

यावेळी खासदार अशोक नेते यांच्यासह आमदार डॉ.देवराव होळी, एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम, मुक्तेश्वर काटवे, केशव निंबोड, विनोद देओ़जवार, हर्षल गेडाम, आशिष कोडाप, संजय मांडवगडे, दीपक सातपुते, अनिल तिडके यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.