धर्मांतरित आदिवासींना ‘एसटी’च्या लाभातून वगळा, महारॅलीचा आवाज दणाणला

डी-लिस्टिंग महामेळाव्यात उठली मागणी

महामेळाव्यात दीप प्रज्वलन करताना खा.अशोक नेते, सोबत आ.कृष्णा गजबे व अन्य.

गडचिरोली : जनजाती सुरक्षा मंच विदर्भच्या वतीने विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी समाजबांधवांनी नागपुरात जमून डी-लिस्टिंग महारॅलीच्या माध्यमातून शहर दणाणून सोडले. रेशिमबाग येथून ईश्वर देशमुख महाविद्यालय, क्रीडा चौकापर्यंत निघालेल्या या महारॅलीत आदिवासी समाजबांधवांनी आपली संस्कृती जपत धर्मांतराला विरोध दर्शवत धर्म बदलणाऱ्यांना आरक्षणाच्या लाभातून वगळण्याची मागणी केली.

या विशाल रॅलीमध्ये व मेळाव्यात खासदार अशोक नेते यांनी सहभाग दर्शविल्याने आदिवासी बांधवांनी त्यांचे स्वागत करत त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी आ.कृष्णा गजबे यांच्यासह विदर्भातील अनेक आदिवासी आमदार उपस्थित होते.

‘धर्मांतर बंद करो, धर्म संस्कृती की रक्षा करो, देश धर्म की रक्षा करो, दायित्व निभाओ ! भगवान बिरसा मुंडा व माता राणी की जय! जय सेवा… सेवा सेवा…’ असे नारे लावत परिसर दणाणून सोडला.

या मेळाव्याला अनेक लोकप्रतिनिधींनी आणि समाजाच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आदिवासी सुरक्षा मंचने कलम ३४२ मध्ये सुधारणा करून धर्मांतरित आदिवासी व्यक्तींना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळून त्यांचे अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात आणावे अशी मागणी केली.

डी-लिस्टिंग म्हणजेच आदिवासी समाजातील असे लोक, ज्यांनी धर्मांतर केले (धर्म बदलला) त्यांना आदिवासी जमातीच्या यादीतून वगळण्यात यावे. त्यांना अनुसूचित जमातीच्या नावाने मिळत असलेल्या आरक्षणाचा लाभ रद्द करण्यात यावा. या विषयावर देशभरात जनजागृती करण्यासाठी आदिवासी सुरक्षा मंच प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या महारॅलीमध्ये आदिवासी समाजातील हजारो नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक साहित्यांसह सहभागी होऊन एकजुटीचे दर्शन घडवले.