Home दैनंदिन बातम्या वृद्धाश्रमातील रक्षाबंधनाने गीता हिंगे यांनी सुरू केलेली परंपरा जपली

वृद्धाश्रमातील रक्षाबंधनाने गीता हिंगे यांनी सुरू केलेली परंपरा जपली

'आधारविश्व'चे सदस्य व वृद्ध गहिवरले

गडचिरोली : निराधारांना आधार देण्यासाठी गडचिरोलीत गीता हिंगे यांनी सुरू केलेल्या आधार विश्व फाऊंडेशनतर्फे, दरवर्षी मातोश्री वृद्धाश्रमात घेतल्या जाणाऱ्या रक्षाबंधनाच्या सोहळ्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवण्यात आली. गीताताईंच्या अपघाती मृत्यूनंतर यावर्षी ही परंपरा खंडीत होते की काय, अशी शंका वृद्धाश्रमातील नागरिकांना वाटत होती. मात्र आधार विश्वच्या पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा घेऊन वृ्द्धांना सुखद धक्का देण्यासोबत गीताताईला आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमाला आधार विश्व फाऊंडेशनच्या सचिव प्रा.सुनिता साळवे, उपाध्यक्षा प्रा.विणा जंबेवार, सदस्य कांचन चौधरी व इतर सदस्य उपस्थित होते. मागील वर्षी आधार विश्वच्या अध्यक्ष गीता हिंगे यांच्यासह इतर सदस्यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा उपक्रम राबविण्यात आला होता. परंतू यावर्षी हा सोहळा होणार की नाही, याचे नियोजन झाले नव्हते. वृद्धाश्रमालाही तसा निरोप मिळाला नव्हता. त्यामुळे गीता हिंगे यांची आठवण काढत त्या मायेपासून आता मुकणार असा विचार करत वृद्ध काहीसे हिरमुसले होते. पण प्रा.सुनिता साळवे यांच्यासह इतर सदस्य वेळेवर का होईना, पण नियोजन करून, वॄध्दाश्रमांत पोहोचले.

सर्व वृद्धांना राख्या बांधून, नाश्ता-मिठाई देण्यात आली. काहीही झाले तरी आम्ही दरवर्षी येणार, असा विश्वास वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. या उपक्रमातून जपलेलं माणुसकीचं, आपुलकीचं नातं कायम राहिल आणि गिताताईंनी सुरू केलेली परंपरा मोडली जाणार नाही, हे पाहून सर्वांना गहिवरून आले.