अहेरी : विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा तालुक्यांत स्मार्ट मीटर बसविण्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (अजित पवार गट) तीव्र विरोध दर्शवला आहे. स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवून जुन्या मीटरची नियमित रीडिंग घेऊन त्याच आधारे वीज बिल आकारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत सात दिवसात निर्णय न घेतल्यास रस्त्यावरून उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या नेतृत्वात महावितरणच्या आलापल्ली येथील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भाग दुर्गम व जंगलव्याप्त असून अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्कची सुविधाही उपलब्ध नाही. त्यामुळे स्मार्ट मीटर आणि ऑनलाइन बिल भरण्याच्या प्रक्रियेमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
यापूर्वी आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी 31 मार्च 2026 रोजी याच विषयावर पत्र दिले होते. मात्र अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. सात दिवसांत स्मार्ट मीटर बसविण्याबाबत आणि जुन्या मीटरच्या नियमित रीडिंगबाबत निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
































