गडचिरोली : गडचिरोलीच्या लांझेडा तलावात बालपणी पोहण्याचे प्राथमिक धडे गिरवणारा जयंत दुबळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर समुद्री जलतरणपटू म्हणून नाव कमावत आहे. इंग्लंड, अमेरिका, श्रीलंका आदी देशांच्या समुद्री जलतरण स्पर्धांमध्ये बाजी मारणाऱ्या जयंतला जगातील सातही समुद्रात पोहायचे आहे. याशिवाय अलिकडेच जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश झालेल्या समुद्री जलतरण या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
क्रीडा सहसंचालक म्हणून पुणे येथे सेवानिवृत्त झालेले जयप्रकाश दुबळे यांचा चिरंजीव असलेला जयंत जागतिक स्तरावर समुद्री जलतरणपटू म्हणून ओळख निर्माण झाल्यानंतर शनिवारी वडीलांसोबत पहिल्यांदा गडचिरोलीत आला. प्राचार्य समशेरखाँ पठाण आणि लिना हकीम यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्याने स्वागताचा स्वीकार केला. तसेच गडचिरोलीकर नागरिकांसोबत संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
जयप्रकाश दुबळे हे 20 वर्षांपूर्वी गडचिरोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी होते. त्यावेळी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचा चिरंजीव असलेल्या जयंतने त्यावेळी बालक म्हणून वडीलांच्या मार्गदर्शनात गडचिरोलीत पोहण्याचे प्राथमिक धडे घेतले. पुढे दुबळे हे पुण्यात क्रीडा उपसंचालक म्हणून कार्यरत होते. पण जयंतसाठी गडचिरोलीत घेतलेले पोहण्याचे धडे त्याच्या आयुष्यासाठी टर्निंग पॅाईंट ठरले.
ब्ल्यु व्हेल, शार्क असलेल्या समुद्रात जलतरण
यावेळी समुद्री जलतरणाचे थरारक अनुभव जयंत याने सांगितले. इंग्डंल, अमेरिकेत शार्क, ब्ल्यू व्हेल या अतिशय खतरनाक मास्यांच्या सानिध्यात जयंतने अनेक किलोमीटरचे समुद्री अंतर पोहत पार केले. श्रीलंकेतून रामेश्वरम् पर्यंतच्या समुद्रात मध्यरात्री पहिले समुद्री जलतरणाचे आव्हान पेलताना विषारी साप आणि शार्कच्या सानिध्यातून त्याला जावे लागले. हे 30 किलोमीटरचे अंतर 9 तास 20 मिनीटात पार करून त्याने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जलद समुद्री जलतरणपटू म्हणून बहुमान पटकावला. आता जगातील इतरही समुद्रांमध्ये पोहण्याचा त्याचा मानस आहे. तसेच 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत समुद्री जलतरण या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी यासाठी तो तयारी करीत आहे.
गडचिरोलीकर युवा वर्गाला मार्गदर्शन करणार
शहरी मुलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील आणि आदिवासी पट्ट्यातील मुलांमध्ये जास्त ताकद आणि क्षमता आहे. पण त्यांना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळत नाही त्यामुळे ते मागे राहात असल्याचे जयंतला वाटते. गडचिरोलीच्या मुलांना केवळ सुविधाच नाही तर चांगल्या मार्गदर्शकांचीही गरज आहे. येणाऱ्या काही वर्षात मी किंवा माझे मार्गदर्शक गडचिरोलीतील मुलांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी येतील आणि येथून आम्ही चांगले जलतरणपटू तयार करू, असा विश्वासही जयंतने प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.