हत्तीरोगापासून दूर राहण्यासाठी गोळ्या घ्या, घरोघरी वाटपाची मोहीम सुरू

कार्यक्रम अधिकाऱ्यांनी घेतली कार्यशाळा

गडचिरोली : विशिष्ट डासांपासून होणाऱ्या हत्तीपायाच्या आजारापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारपासून गोळ्या वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. तत्पूर्वी पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालयाचे सहसंचालक तसेच फायलेरिया निर्मूलन राज्य कार्यक्रम अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी संबंधित अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांची आॅनलाईन कार्यशाळा घेतली. त्यात त्यांनी या आजारापासून दूर राहण्यासाठी वर्षातून एक वेळ आरोग्य कर्मचाऱ्यांकडून वाटल्या जाणाऱ्या हत्तीरोग निर्मूलन गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन केले.

महाराष्ट्रातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड या 5 जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांमध्ये दि.२६ मार्चपासून घरोघरी हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत गोळ्यांचे वाटप सुरू करण्यात आले. या मोहिमेत प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पाचही जिल्ह्यात 45 लाख 34 हजार 653 लोकांना गोळ्यांचे वाटप करून केले जाणार असल्याचे कार्यशाळेत सांगण्यात आले. यात गडचिरोली जिल्ह्यातील 2 लाख 55 हजार 647 लोकांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत तिहेरी औषधांचा अवलंब केला जाणार आहे. यात डीईसी, अल्बेंडाझोल आणि इवरमेक्टिन ही तीन औषधे देण्यात येतील. प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी बूथवर आणि घरोघरी भेटी देऊन पूर्वनिश्चित डोसनुसार ही औषधे देतील.

ही औषधे रिकाम्या पोटी घेऊ नयेत, तसेच २ वर्षाखालील मुले, गरोदर महिला आणि गंभीर आजारी व्यक्तींना ही औषधे कार्यक्रमादरम्यान दिली जाणार नसल्याचे डॅा.पवार यांनी स्पष्ट केले. आरोग्य सेवा संचालनालय नागपूर क्षेत्राचे सहाय्यक संचालक (मलेरिया) डॉ.एस.डी. निमगडे यांनी कार्यशाळेत बोलताना, फायलेरियासिस प्रतिबंधक औषधे घेतल्याने सामान्य व्यक्तींवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र जर एखाद्याला औषध घेतल्यानंतर उलट्या, चक्कर येणे, खाज सुटणे किंवा मळमळ यासारखी लक्षणे जाणवली तर त्यांच्या शरीरात मायक्रो-फायलेरिया असल्याचे ते लक्षण असते. ते या औषधांच्या सेवनाने नष्ट होते. या कार्यक्रमादरम्यान औषध घेतल्यानंतर कोणत्याही लाभार्थ्याला अडचणी आल्यास, रॅपिड रिस्पॉन्स टीम मदतीला येईल, असे त्यांनी सांगितले. ही औषधे सुरक्षित असून उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवात किंवा इतर सामान्य आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी ती घेतली पाहिजेत यावर त्यांनी भर दिला.

यावेळी डॉ.प्रेमचंद्र कांबळे, कीटकशास्रज्ञ डॉ.महेंद्र जगताप, जागतिक आरोग्य संघटनेचे राज्य एनटीडी समन्वयक डॉ.समाधान देबाजे, ग्लोबल हेल्थ स्ट्रॅटेजीजचे अनुज घोष यांनीही मार्गदर्शन केले.