जिल्ह्यात बीएसएनएलच्या सेवेचा खेळखंडोबा, अर्ध्याअधिक नागरिकांना मिळेना इंटरनेट

दुर्गम भागासह शहरातही विस्कळीतपणा

गडचिरोली : जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड, अर्थात बीएसएनएल या दूरसंचार कंपनीची सेवा अलिकडे पुन्हा विस्कळीत झाली आहे. काही क्षण किंवा काही तास नाही, तर चक्क काही दिवसपर्यंत इंटरनेट सेवा ठप्प पडण्याचा रेकॅार्ड या कंपनीने आपल्या नावावर केल्यामुळे बीएसएनएलच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नक्षलग्रस्त, दुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अलिकडच्या काही वर्षापर्यंत खासगी दूरसंचार कंपन्या सेवा देण्यासाठी पुढे येत नव्हत्या. त्यामुळे बीएसएनएल या सरकारी कंपनीशिवाय पर्याय नसल्यामुळे या कंपनीची सेवा घेणारे लाखो ग्राहक दुर्गम भागापर्यंत आहेत. अलिकडे बीएसएनएलचे टॅावरही वाढल्यामुळे दुर्गम भागापर्यंत या कंपनीचे नेटवर्क बऱ्याच प्रमाणात पोहोचले आहे. पण अखंडीत सेवा देण्यात या कंपनीला अद्याप यश आलेले नाही.

गडचिरोली शहरात ब्रॅाडबँड सेवा घेणाऱ्यांचे इंटरनेट कनेक्शन कधी बंद पडेल याचा नेम राहिलेला नाही. एका खासगी एजन्सीमार्फत बीएसएनएलकडून ही सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविली जाते. पण त्यात व्यत्यय येणे नेहमीचे झाले आहे. त्यामुळे अनेक ग्राहक ही सेवा बंद करण्याच्या मानसिकतेत आले आहेत.

याशिवाय भामरागड, कोरची, धानोरा, सिरोंचा या भागात इंटरनेट सेवा कधी बंद पडेल याचा भरवसा नसतो. भामरागडमध्ये तर अलिकडे इंटरनेट सेवेमुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. हेमलकसा येथील डॅा.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देण्यासाठी राज्याभरातील आणि राज्याबाहेरील लोक येत असतात. पण एकमेव नेटवर्क असलेल्या बीएसएनएलची सेवा वारंवार बंद पडत असल्याने पर्यटकांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेऊन या सरकारी कंपनीच्या सेवेत सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.